“अकोल्यात शांततेचा मार्च! पोलिसांचा सामाजिक सलोख्याला हात”
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली बकरी ईदपूर्वी शांतता आणि ऐक्याचे दर्शन
अकोला-: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात सौहार्दपूर्ण वातावरण राहावे, सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी आज अकोला पोलिसांच्या वतीने नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात शहरात भव्य पथसंचलन काढण्यात आले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास जागवणारे हे संचलन शहरवासीयांच्या कौतुकाचा विषय ठरले.
पथसंचलनाची भव्य यात्रा!
शहरातील हरिहर पेठ येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. त्यानंतर हे संचलन चांदखा प्लॉट, सप्तश्रृंगी देवी मंदीर, किल्ला चौक, तुराबअली मस्जिद, मासूमशहा दर्गा, सराफा चौक, गांधी चौक मार्गे गणेश घाट येथे विसर्जनापर्यंत नेत्रदीपक मार्गक्रमण झाले. रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांनी पोलिसांचे स्वागत करत शांततेच्या आवाहनाला पाठिंबा दिला.
अधिकार्यांची उपस्थिती
या संचलनात अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, अकोल्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, २९ पोलीस अधिकारी, २२१ पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस बलाचे ४० जवान, तसेच ३१ होमगार्ड्स सहभागी होते.
वाहन ताफाही ठसा उमटवणारा!
संचलनात पोलिसांच्या वज्र वाहन, दामिनी पथक, डायल ११२, विशेष पेट्रोलिंग युनिट आदी वाहनांचा ताफा सहभागी होता. हे दृश्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा भक्कम विश्वास निर्माण करणारे ठरले.
सौहार्दाचे आवाहन
संचलनाच्या माध्यमातून पोलिसांकडून नागरिकांना शांतता, ऐक्य आणि सहकार्याचे आवाहन करण्यात आले. “बकरी ईदचा सण शांततेत व सौहार्दात पार पडावा” यासाठी अकोला पोलिस दल सतर्क असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले.
नागरिकांचा प्रतिसाद
पथसंचलन पाहण्यासाठी रस्त्यालगत जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. “पोलीस आमच्यासोबत आहेत” ही भावना शहरवासीयांमध्ये अधिक दृढ झाली आहे.
नवीन पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात अकोल्यात सौहार्दाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. शिस्त, सुरक्षा आणि सलोखा या त्रिसूत्रीवर चालणारे हे पोलीस दल सण साजरा करताना समाजात एकतेचा प्रकाश पसरवत आहे.


Post a Comment
0 Comments