Type Here to Get Search Results !

अकोला व हिवरखेडमध्ये उन्हाचा कहर तापमानाने गाठला 45 अंशाचा टप्पा भरदिवसात रस्त्यांवर शुकशुकाट

 अकोला जिल्हा/उपसंपादक 

आशिष वानखडे 

मे महिन्याची सुरुवात होताच हिवरखेड शहरात उष्णतेची लाट प्रचंड तीव्र झाली असून शुक्रवारी येथील कमाल तापमान तब्बल ४५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी ११ ते ४ या वेळेत रस्त्यावर नागरिकांची वर्दळ दिसेनाशी झाली असून व्यापारी, फेरीवाले, शालेय विद्यार्थी आणि कामगारवर्ग यांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.


*घरोघरी उन्हामुळे त्रस्त जनता*

शहरातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर घरात राहूनच नागरिक वेळ घालवत आहेत. कामावर जाणाऱ्या मजूर वर्गाला उन्हाच्या झळा सोसून बाहेर पडावे लागत आहे. बाजारपेठांमधील वर्दळ घटल्याने स्थानिक दुकानदारांचे व्यवहारही मंदावले आहेत. हातगाडीवाले आणि लहान व्यवसाय करणाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडत चालली आहे.


*आरोग्यावर घातक परिणाम*

उष्णतेच्या लाटेमुळे डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, घामोळी, डिहायड्रेशन अशा आरोग्यविषयक समस्या वाढू लागल्या आहेत. हिवरखेड ग्रामीण रुग्णालयात ताप आणि घामाच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दाखल होत आहेत. डॉक्टरांनी नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.


*शाळकरी मुले आणि वृद्धांची स्थिती गंभीर*

सकाळच्या सत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांची उपस्थिती कमी झाली असून, शिक्षक आणि पालक वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वृद्ध व्यक्तींनाही उष्णतेमुळे त्रासदायक परिस्थिती अनुभवावी लागत आहे.


*हवामान खात्याचा इशारा-*

हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था, सावलीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.


नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, लू पासून बचावासाठी टोपी, गॉगल्स, छत्री यांचा वापर करावा, अशी आरोग्य विभागाची विनंती आहे.

Post a Comment

0 Comments