Type Here to Get Search Results !

प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनात वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारावर कारवाई – अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा? .

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनात वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारावर कारवाई – अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा?

 जळगाव जामोद दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली 'शेतकऱ्यांची कर्जमाफी करा' या प्रमुख मागणीसाठी एकाच दिवशी मशाल ताठे आंदोलन करण्यात आले. 

संपूर्ण राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडले आणि विविध ठिकाणी पत्रकारांनी घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलनाचे वृत्तांकन केले.

मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे जळगाव जा येथे स्थानिक आमदार डॉ. संजय कुटे यांच्या विधानसभा क्षेत्रात आंदोलकांबरोबरच बातमी संकलनासाठी गेलेल्या एका पत्रकारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1)(3) आणि अधिनियम 135 अंतर्गत अप. क्र. 0221/2025, दिनांक 12 एप्रिल 2025 नुसार ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सौरभ बावसकर, आकाश शेगोकार, राजू हातेकर, रवींद्र चौधरी यांच्यावर करण्यात आली आहे, परंतु त्याचवेळी घटनास्थळी बातमी संकलन करणाऱ्या पत्रकारालाही या कारवाईत सामील करण्यात आले आहे, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.

राज्यातील इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन दरम्यान वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारावर अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे जळगाव जा मधील ही कारवाई पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा आरोप होत आहे. भारतीय संविधानाने पत्रकारांना घटनास्थळी जाऊन बातम्या संकलित करण्याचे अधिकार दिले असून, अशा प्रकारे त्यांच्या कामावर गुन्हे दाखल होणे हे लोकशाहीसाठी धोकादायक पाऊल आहे.

पत्रकार संघटनांनी आणि लोकशाहीत विश्वास असणाऱ्या नागरिकांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य स्पष्टीकरण आणि न्याय्य चौकशीची मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments