संग्रामपुर प्रतिनिधि... स्वप्निल देशमुख
पत्रकार, समाजसेविकेचा छळ करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी!
खोट्या बातम्यांमधून बदनामी; वडनेर भोलजीतील प्रकाराने पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह
स्वप्निल देशमुख
प्रतिनिधी | संग्रामपूर
वडनेर भोलजी (ता. नांदुरा) येथे युवा मराठा महासंघ महिला जिल्हाध्यक्ष तथा समाजसेविका सौ. उमा गोपाळ बोचरे यांच्यावर मानसिक व सामाजिक पातळीवर घृणास्पद पद्धतीने छळ झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक १ मे २०२५ ते ३ जुलै २०२५ दरम्यान आरोपी अजमतबेग उर्फ बाबा मिर्झा अकबर बेग मिर्झा (वय ३७) याने सौ. उमा बोचरे यांचा पाठलाग करत अश्लील इशारे, अपमानास्पद वर्तन, तसेच जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, स्थानिक वृत्तपत्रामार्फत खोटी व बदनामीकारक बातमी प्रकाशित करण्याची धमकी देत मानसिक छळही केला.
दिनांक ३ जुलै २०२५ रोजी "दैनिक जागृत मालक" या स्थानिक वृत्तपत्रात सौ. बोचरे यांच्याविरोधात खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामुळे केवळ संबंधित व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण महिला व पत्रकार समाजाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.
निवेदनकर्त्यांच्या मागण्या:
संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस प्रशासनाने तत्काळ विशेष पावले उचलावीत.
पत्रकारितेचा गैरवापर करणाऱ्या व खोट्या बातम्यांनी बदनामी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे.
वादग्रस्त बातमी प्रकाशित करणाऱ्या स्थानिक वृत्तपत्राची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार, समाजसेवक व संघटनांनी एकवटून दिलेले हे निवेदन महिलांच्या सुरक्षितता, पत्रकारिता आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनावर पत्रकार स्वप्निल देशमुख, अमोल ठाकरे, रामेश्वर गायकी, दयालसिंग चव्हाण, सुनील मुकुंद, सचिन पाटील, शेख कदिरभाई, विवेक राऊत, मनोज पाटील आदींच्या सह्या आहेत.



Post a Comment
0 Comments