आडगाव राजा तिर्थक्षेत्र विकास निधीचा राजकारणासाठी वापर? – गावकऱ्यांत आणि जाधव वंशजांत तीव्र संताप!
गुलशेर शेख
सिंदखेडराजा (बुलडाणा): तालुक्यातील आडगाव राजा हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून, येथे राजे लखुजी जाधवराव यांचे कुलदैवत वसलेले आहे. गावकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीनुसार येथे तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला होता. मात्र आता या निधीचा वापर स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
सध्या कार्यरत लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांनी सदर निधी सिंदखेडराजा शहरात नेण्याचा प्रयत्न केला असून, त्यामुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. या निर्णयामुळे राजे जाधव कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे ठिकाण केवळ गावाचे नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासाचे गौरवस्थान आहे.
स्थानिक नागरिक आणि जाधव कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही आमच्या श्रद्धेची बाब आहे. आमच्या कुलदैवताच्या स्थळावरील विकासकामे फक्त ठरवलेल्या ठिकाणी व्हावीत. निधी वळवून धार्मिक भावनांवर आघात करू नये.”
यासंदर्भात आयुष राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांना निवेदन देण्यात आले असून, ७ मार्च २०२५ च्या मुख्यमंत्री व मंत्रिगटाच्या आदेशाची आठवण करून देण्यात आली आहे. तरीही स्थानिक राजकारणाचे कुरघोडी करत कामे अडवण्याचे प्रकार सुरु आहेत.
गावकऱ्यांची मागणी आहे की, "सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, आणि निधी आडगाव राजा येथेच खर्च होईल याची स्पष्ट ग्वाही द्यावी. अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलनाची भूमिका घेतील."

Post a Comment
0 Comments