Type Here to Get Search Results !

अकोल्यात नाकाबंदीदरम्यान कोयत्यासह दोघे ताब्यात; ६२ कोयते जप्त, तिघांना अटक!

 अकोल्यात नाकाबंदीदरम्यान कोयत्यासह दोघे ताब्यात; ६२ कोयते जप्त, तिघांना अटक!




अवैध शस्त्रसाठा व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अकोला पोलिसांची धडक कारवाई

अकोला : अकोला शहरात सुरू असलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत कोयत्यासह दोघांना ताब्यात घेतले, तर अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी एकूण तिघांना अटक केली. या कारवाईत दुकानातून तब्बल ६२ लोखंडी कोयते, दोन दुचाकी व इतर साहित्य असा एकूण ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार अकोला शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध धंदे आणि शस्त्रांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती.

दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास सरकारी बगिच्यासमोर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी भूषण सोळंके व पोहेकॉ. अश्विन चव्हाण नाकाबंदी करत असताना विनानंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून दोघे संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी दुचाकीवर एक लोखंडी कोयता आढळून आला. याप्रकरणी मुजम्मिल खान युनूस खान (वय २३, रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर, अकोला) आणि सय्यद फिरोज सय्यद जानी (वय २६, रा. नेहरू नगर, खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास करताना पोलिसांनी शांतीनगर परिसरातील लोखंडी बाजारातील एका दुकानाची तपासणी केली. तेथे दुकानमालकाकडून मोठ्या प्रमाणात लोखंडी कोयते आढळून आले. पोलिसांनी एकूण ६२ कोयते जप्त केले. या प्रकरणात दुकानमालक आरिफ खान उमर खान (वय ५२, रा. लकी फर्निचरजवळ, कोठडी बाजार, अकोला) यालाही अटक करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या ६२ कोयत्यांची किंमत १२ हजार ४०० रुपये असून, एका कोयत्यासह विनानंबर प्लेटची दुचाकी आणि अन्य साहित्य असा एकूण ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

नाकाबंदीमुळे अवैध वाहतूक व शस्त्रसाठ्यावर नियंत्रण मिळविण्यास मदत होत असून, अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस निरीक्षक विलास पाटील तसेच शहर वाहतूक शाखेच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments