Type Here to Get Search Results !

नांदुरा शहरात रेशन धान्याचा खुला गैरव्यवहार.

 नांदुरा प्रतिनिधी.आझाद पठाण 

नांदुरा शहरात रेशन धान्याचा खुला गैरव्यवहार!

पुरवठा अधिकारी पूनम थोरात आणि विकी उधाणी यांच्या संगनमताची सखोल चौकशी करा – समाजवादी पक्षाची मागणी


नांदुरा, 16 जून 2025 –

दिनांक 06 जून रोजी निनावी तक्रारीच्या आधारे तहसील प्रशासनाने नांदुरा शहरातील नागलकर प्लॉट परिसरात धडक कारवाई करत गव्हाचे तब्बल 502 कट्टे एका खासगी गोडाऊनमध्ये जप्त केले. सदर धान्य सरकारी रेशनचा असल्याची जोरदार शक्यता असून, हा धान्यसाठा स्वस्त धान्य दुकानदार एन. के. उधाणी यांच्या नावावरून वितरीत करण्यात आलेला असल्याचा संशय आहे.


यावेळी घटनास्थळी एन. के. उधाणी यांचे चिरंजीव विकी उधाणी उपस्थित होते. त्यांनी सदर धान्य वैध असल्याचे सांगितले असले तरी, नांदुरा शहरात चर्चेचा भडका उडाला आहे की हे धान्य पुरवठा अधिकारी पूनम थोरात आणि विकी उधाणी यांच्या संगनमताने काळ्या बाजारात विकले जात होते.


तसेच विकी उधाणी काही हॉटेलमध्ये उघडपणे बोलत असल्याचे समोर आले आहे की –


> "सदर धान्य मॅडमचे आहे, कोणी कितीही तक्रार केली तरी चौकशी मीच बघणार!"

हे विधान प्रशासनातील माफियाश्रयी साठ्यांची पोलखोल करणारे असून, यामध्ये संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांच्या थेट संलिप्ततेचा गंभीर संशय आहे.




पुढील बाबींचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे:


विकी उधाणी यांनी गोडाऊनसाठी दिलेला अर्ज 01 जून 2025 रोजी मंजूर करून केवळ दोनच दिवसांत म्हणजे 03 जून रोजी पुरवठा अधिकारी श्रीमती पूनम थोरात यांनी मंजुरी दिली — ही धावपळ संशयास्पद!


भाडेपट्टा करारनामा 13 मार्च 2024 रोजीचा असून देखील त्याला मागील तारखांचा दाखला देऊन वैध ठरवले गेले – ही बाबही काळजीपूर्वक तपासण्यासारखी आहे.


पुरवठा अधिकारी पूनम थोरात या याआधीही विवादग्रस्त निर्णय आणि वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत राहिल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, प्रशासनाचे दुहेरी धोरण समोर येत आहे.



समाजवादी पक्षाच्या वतीने आम्ही ठाम मागणी करतो की:


1. पूनम थोरात आणि विकी उधाणी यांच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी होावी.



2. त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्यात यावेत.



3. विक्री केलेल्या रेशन धान्याचा मागोवा घेत, संपूर्ण कनेक्शन उघड करण्यात यावे.



4. पूनम थोरात यांची तात्काळ बदली करून त्यांच्या विरोधातील सर्व जुन्या तक्रारींची पुन्हा चौकशी करण्यात यावी.



5. दोषींवर कडक गुन्हे दाखल करून, जनतेच्या हक्काच्या धान्यावर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांची सार्वजनिक निलंबन करण्यात यावे.




या प्रकरणात प्रशासनाने त्वरित आणि निर्भीडपणे कारवाई न केल्यास, समाजवादी पक्ष जनतेसोबत रस्त्यावर उतरेल आणि आंदोलनाचे तीव्र रूप घेईल.


– आझाद खा युनुस खा पठाण

युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी

गांधी चौक, नांदुरा – बुलढाणा

दिनांक: 16 जून 2025

Post a Comment

0 Comments